पिंपरी (Pclive7.com):- हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पिंपरी येथे रविवारी (दि.९) दुपारी ०३ वाजता मिलिंदनगर येथून पुणे-मुंबई महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी विभागांतर्गत रविवारी दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यावेळी क्रोमा शोरुमकडून गोकूळ हॉटेलकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. पिंपरी चौकाकडून इंदिरा गांधी पुलाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
■ महावीर चौक, चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डीमार्ट समोरील इनमर्जमध्ये ग्रेड सेपरेटरमध्ये वळविली आहे.
■ नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिपरीकडे सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डेअरी फार्म येथून ग्रेड सेपरेटरमध्ये व पेट्रोल पंप, खराळवाडी येथून ग्रेड सेपरेटरमध्ये वळविली आहे.
■ इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिपरीकडे येणारी वाहतूक बंद करून लिंक रस्त्याकडे वळविली आहे.
■ नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद करून एचए कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनीकडे वळविली आहे.