पिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवी यासाठी जंग जंग पछाडणार्या आमदार महेश लांडगे यांनी अखेर ‘पेटा’च्या विरोधात एल्गार पुकारला आहे. महेश लांडगे आणि बैलगाडा संघटनांच्या प्रयत्नांनंतर विधानसभेत बैलगाडा बंदी उठवणारे विधेयक पास झाले खरे..पण पेटा न्यायालयात गेल्याने विधेयका नंतर ही बंदी कायम राहिली…त्यामुळे राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरणारा हा निर्णय होण्यात पेटाचा अडथळा लक्षात घेऊन, लांडगे यांनी पेटालाच लक्ष्य केलंय…! त्यासाठी त्यांनी पेटाचा विरोध करणारा ड्रेस परिधान करत बैलगाडा शर्यती वरील बंदी उठवण्याच्या आंदोलनात भाग घेतला आहे.
राज्यात तमीळनाडू येथील जलीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी ‘पेटा’ या संस्थेविरोधात तळेगाव चौक, चाकण येथे आज जनआंदोलन उभारण्यात आले आहे. राज्य सरकार शेतक-यांच्या बाजुने आहे. बैलगाडा मालक शेतक-यांचा खरा शत्रु ‘पेटा’ ही संस्था आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद, गट-तट बाजुला ठेवून या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावे. बळीराजाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी राज्य सरकारला साथ द्यावी, असे तमाम बैलगाडा मालक, चालक आणि शौकिनांना आमदार महेश लांडगे यांनी आवाहन केले होते.
त्यानुसार आज चाकण येथे सुरू झालेल्या पेटा हटाव आंदोलनात आमदार लांडगे यांनी पेटाला विरोध करणारा ड्रेस परिधान केला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.