पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत पती-पत्नी कामासाठी बाहेर गेले होते. (दि. १७) रोजी नेहमीप्रमाणे दोघेही नोकरीसाठी गेले असताना सायंकाळी ५ च्या सुमारास राहत्या घरातुन सोन्याचे गंठन, मिनी गंठन, सोन्याची ठुशी, अंगठी असा सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पोलीस अंमलदार यांना चोरीच्या तपासाच्या सुचना देवून समांतर तपास सुरु केला.
घटनास्थळी दरवाजाचे कुलूप किंवा कडी-कोयंडा तोडलेला नव्हता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची सातत्याने वेळोवेळी पाहणी केली. चोरटयाने बनावट चावीचा वापर केला असावा असा संशय बळावला. दरम्यान नेहरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा लावुन आरोपीला ताब्यात घेतले. उमेश रमेश भोसले (वय २८ वर्षे, धंदा- हॉटेल कुक, रा. मुळ चिंचोली ता. आवसा जिल्हा लातुर, सध्या शिवदत्त रिसॉर्टमध्ये शिरकोली ता. वेल्हे जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सोन्याचे गंठन, सोन्याची ठुशी, सोन्याचे मिनी गंठन व सोन्याची अंगठी असा एकूण १,५०,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिने हस्तगत केले. त्याने ओळखीचा फायदा घेवून बनावटी किल्लीचा वापर करून चोरी केल्याची कबुली दिली. चोरट्याकडे इतर घरफोडी चोरी गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल तपास करुन गुन्ह्याचेकामी पिंपरी पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, पोलीस नाईक आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस कॉनस्टेबल शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांनी केली आहे.