पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराकरिता स्वतंत्र वीज मंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात सध्या महावितरणच्या गणेशखिंड मंडल कार्यालय अंतर्गत पिंपरी व भोसरी अशी दोन वीज वितरण विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. चिंचवड मतदारसंघातील थेरगाव, किवळे, वाल्हेकरवाडी, ताथवडे, वाकड, चिंचवड, पिंपळे निलख, सौदागर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.
विजेच्या समस्यांमुळे परिसरातील नागरिक, व्यापारी,हिंजवडी आयटी पार्क मध्ये कार्यरत असलेले अभियंते, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. उद्योगनगरीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून ही त्याप्रमाणात वीजचे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. उद्योगनगरीत विशेषत: चिंचवड मतदारसंघातील किवळे, रावेत, मामुर्डी, ताथवडे,वाकड,काळेवाडी चिंचवड भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, भूमिगत वायरिंग, वीज रोहित्रेची क्षमता वाढ करणे , नवीन सब स्टेशन, इत्यादीची निर्मिती करणे आवश्यक आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. एमआयडीसी परिसरातील वाढत्या औद्योगिकरणामुळे उच्चदाब ग्राहक (HT) व शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बांधण्यात येणाऱ्या सहकारी गृहरचना संस्थातील रहिवाश्यांमुळे लघुदाब (LT) ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील दोन लाख ग्राहकांना एक विभागीय कार्यालय यानुसार शहरात तीन वीज वितरण विभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे.
तीन विभागीय कार्यालयासाठी एक मंडल कार्यालय याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराला वीज अधिकारी, कर्मचारी, कार्यालय यांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना वीजेच्या समस्या सोडविण्याकरिता वारंवार पुणे येथील मंडल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराकरिता वीज वितरण कार्यालयाची पुनर्रचना करून शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडल स्थापन करावी अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी केली.