पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील कै.मधुकर पवळे उड्डाण पूलाजवळ कठड्याला टँकर धडकून अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टॅंकरचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून टँकरला बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
मधुकर पवळे उड्डाण पुल येथील भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू असून त्यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त भुयारी मार्ग काम करत असलेल्या ठेकेदाराला मुदतवाढ देत आहेत. हा ठेकेदार महानगरपालिकेचा जावई आहे का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे.
या कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. अचानक वळण घेण्याच्या प्रयत्नात गाडी कठड्यावर आदळून अपघात होत आहेत.