पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काका आणि पुतणे म्हणजेच अजितदादा पवार आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून आहे, आणि हाच बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार हे वारंवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. असं असताना आता अजित पवार यांनीच थेट रोहित पवार यांना लक्ष करत त्यांचं नाव न घेता टीका केली आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या गणपती देखावा आणि गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, संजोग वाघेरे, विलास लांडे, नाना काटे, राजू मिसाळ, मंगला कदम, वैशाली काळभोर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात काहीजण येऊन वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांना माहित आहे, की स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्यानंतर मीच पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घातलं. वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले. शहरातील विकासासाठी मी कटिबद्ध राहिलो. शेवटच्या घटकाचा विचार करून मी निर्णय घेतले. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा १९९२ पासून आज तागायत करत आलो आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेकांना महत्त्वाची पदे दिली. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group