पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवात डीजेचा आवाज आणि लेजर लाईटमुळे अनेकांना त्रास झाला. काहींना बहिरेपणा आले, तर काहींना हार्टअटॅक आला. लेझर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. डीजेमुळे कानाला इजा होते. लोकांना त्रास होतो. पण कोण कोणाचं ऐकणार? लेजर लाईट आणि डीजे विना गणेशोत्सव, इतर उत्सव साजरे करण्याचा संकल्प करावा. अन्यथा कडक कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण पवार यांच्या हस्ते आज (दि.२०) आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, श्याम लांडे, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यास चालना मिळणार आहे. सध्या राज्यात सगळीकडेच प्रदूषण वाढले आहे. त्याला आपण सर्वजण जबाबदार आहोत. जबाबदारीचे भान दुर्दैवाने सर्वाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे ते म्हणाले.