खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट
मावळ (Pclive7.com):- पनवेल (नवी मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत कारवाई सुरु आहे. याबाबत लवकरच योग्य तो सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले. त्यामुळे पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, असा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे नवी मुंबई जवळ पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे ऑक्टोबरमध्ये उद्घाटन झाले आहे. २५ डिसेंबरपासून विमानतळ पूर्ण क्षमतेने चालू होणार आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलने केली आहेत. दि.बा.पाटील यांच्याबाबत लोकांमध्ये मोठा आदर आहे. लोकभावना आणि दि.बा.पाटील यांचे कार्ये पाहून महाराष्ट्र शासनाने विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले जाईल, असे आश्वासन स्थानिक लोकांना दिले आहे. विरोधक याला राजकीय मुद्दा बनवत असून वातावरण खराब करित आहेत. त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यामुळे पनवेल (नवी मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत कारवाई सुरु आहे. याबाबत लवकरच योग्य तो सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन मंत्री नायडू यांनी दिले.























Join Our Whatsapp Group