
पिंपरी (Pclive7.com):- बनावट ऑर्डर बिले तयार करून कंपनीच्या ग्राहकांसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत तब्बल एक कोटी एक लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसात आरोपी अनिल सिद्धेश्वर हिरवे (वय.२९, रा. राम हाउसिंग सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली रूपीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विवेक नामदेव चव्हाण (वय ३७, रा. ऐश्वर्यम हाऊसिंग सोसायटी, चिखली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरवाडी येथे असलेल्या सी.जी. मार्केटिंग कंपनीत २१ जून २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपीने कंपनीच्या ग्राहकांसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेत बनावट ऑर्डर बिल तयार करून कंपनीकडून डिटर्जंट पावडर, शॅम्पू, डायपर, डिओ आदी घरगुती वस्तू उचलल्या. या वस्तू डिलिव्हरी बॉयच्या मदतीने इतर दुकानदारांना विक्री करून आरोपीने कंपनीची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल शेटे करित आहेत.






















Join Our Whatsapp Group