तळवडे (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ तळवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने प्रचाराची आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसांचा कालावधी हातात असल्याने उमेदवार आणि युवक कार्यकर्ते थेट होम टू होम प्रचारात उतरले असून, विकासकामांची माहिती देत नागरिकांशी थेट संवाद साधला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सौ.सीमा धनंजय भालेकर आणि सौ. चारुलता सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा युवकांनी खांद्यावर घेतली आहे. उमेदवारांचा परिचय तसेच आतापर्यंत झालेल्या विकासकामांची माहितीपत्रके वाटप करत नागरिकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तळवडे प्रभाग रेडझोन हद्दीत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक पंकज भालेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. ही वस्तुस्थिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी उमेदवारांशिवाय स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभारून प्रचार अधिक तीव्र केला आहे.

प्रभागातील त्रिवेणीनगर परिसरातील विश्वमाला, त्रिमूर्ती, त्रिवेणी आणि सहजीवन हौसिंग सोसायटीत नागरिकांच्या घरोघरी भेटी देत प्रचार करण्यात आला. “विकासकामांना गती देणाऱ्या आणि विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाला आशीर्वाद द्या,” असा ठाम संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचार पाहता, निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाने सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत.






















Join Our Whatsapp Group