पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना प्रभाग क्रमांक २१ मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात नकली दारू पकडल्याने राजकीय वर्तुळात तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंदाजे ११ बॉक्स नकली दारू पकडली असून, ही दारू मतदारांना वाटपासाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात दारू वाटप करणारे सुमारे पाच ते सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्वरित निवडणूक आयोग तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक हे घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित वाहनासह घटनास्थळी आढळलेले सर्व नकली दारूचे बॉक्स ताब्यात घेतले असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group