पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात देशातील सर्वाधिक उंचीचा उभारलेला राष्ट्रध्वज वाऱ्यामुळे सतत फाटत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या महिनाभरापूर्वी तो खाली उतरविला आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी तरी या ध्वजाचे काम पूर्ण होऊन तो डौलाने फडकावा अशी मागणी शहरवासीय करत आहेत.
देशाच्या वाघा सीमेजवळ यापूर्वी उभारलेल्या १०५ मीटर इतक्या उंचीच्या राष्ट्रध्वजापेक्षा जास्त १०७ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज निगडी येथे आहे. येथील ध्वजस्तंभावरील ध्वजाचा आकार ८० फूट बाय १२० फूट इतका आहे. २६ जानेवारीला या ध्वजाचे अनावरण झाले होते. वाऱ्याच्या झोताने ध्वज फाटत असल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे ध्वज महिनाभरापूर्वी खाली उतरविण्यात आला होता. ध्वजाचे कापड वारंवार फाटत असल्याने कापडाचा नमुना तपासणीसाठी डिपार्टमेंट ऑफ फायबर ऍण्ड टेक्स्टाईल प्रोसिजर टेक्नॉलॉजी या सरकारी संस्थेकडे दिला आहे. संबंधित संस्थेकडून त्याबाबत संशोधन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेचे स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले की, निगडी येथे तब्बल १०७ मीटर इतक्या उंचीवरील ध्वजस्तंभावर ध्वज फडकविण्यात येतो. त्यामुळे इतक्या उंचीवर वाऱ्याच्या वेगाने ध्वजाचे कापड कोपऱ्यात फाटते. पावसाळ्यात कापडाचे वजन वाढते. ध्वज नियमित लावायचा की काही कार्यक्रमांसाठी लावायचा याबाबत सुरक्षा विभागाला अधिकार आहेत. तसेच झेंड्याचे मॉनेटरिंग प्रभाग प्रमुख करत आहेत. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनीपूर्वी नक्कीच झेंडा फडकवला जाईल.





















Join Our Whatsapp Group