
पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांवर दुर्गभ्रमंती करत रहाटणीतील अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्योतिबा कॉलनी येथील कु. शर्विका म्हात्रे हिने तब्बल १७५ गडकिल्ले सर करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

इतक्या लहान वयात कठीण चढाई असलेले किल्ले पार करत शर्विकाने दुर्गभ्रमंतीत नवा आदर्श निर्माण केला असून तिच्या जिद्दीचे आणि साहसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शर्विकाच्या या यशाची दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती देऊन तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना काटे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे आपल्या स्वराज्याचे सामर्थ्य असून त्यांची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या मोबाईलच्या युगात मुलांनी अशा ऐतिहासिक आणि साहसी उपक्रमांकडे वळणे ही काळाची गरज आहे. शर्विकाचे हे यश इतर मुलांसाठी प्रेरणादायी आहे.”

या गौरव सोहळ्याला उद्योजक भरत काटे, कैलास कुंजीर, निलेश कुंजीर, शैलेश कुंजीर, शर्विकाचे कुटुंबीय तसेच ज्योतिबा कॉलनीतील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. शर्विकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील दुर्गमोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.




















Join Our Whatsapp Group