पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामांसाठी कुशल प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून, या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

एमएनजीएल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत कंपनीने घरगुती गॅस पाईपलाईन जोडणी कामासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व्यक्त करत महापालिकेकडे सहकार्याची विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेतील प्लंबर ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एमएनजीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी विद्यार्थ्यांना कामकाजाची सविस्तर माहिती दिली. इच्छुक प्लंबर्सना एमएनजीएलकडून दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यानंतर अनुभवी प्लंबर्सच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष साईटवर काम शिकविले जाईल, असे त्यांनी सांगितले. भविष्यात सीजीडी कंपन्यांमध्ये कुशल प्लंबर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवड करण्यात आलेले प्लंबर्स हे एमएनजीएलच्या अधिकृत व्हेंडर्स अंतर्गत काम करणार आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एमसीव्ही टू इंस्टॉलेशन, मीटर इंस्टॉलेशन, कॉपर पाईपिंग तसेच किचन कन्वर्जन यांसारख्या कामांचा समावेश असेल. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास भविष्यात स्वतःचे उद्योजक बनण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. तसेच जॉबवर्कनुसार महिन्याला सुमारे ७० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
संस्थेतील सुमारे ४० ते ५० प्लंबर विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याची उत्सुकता दर्शविली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले. आणखी इच्छुक प्लंबर्सनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी एमएनजीएलचे उपप्रबंधक ओम उगले व उपप्रबंधक अमोल वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गटनिदेशक शर्मिला काराबळे, गटनिदेशक रवी ओव्हाळ, निदेशक किसन गावडे, निदेशक विक्रम काळोखे आणि निदेशक विशाल रेंगडे यांनी विशेष प्रयत्न केले.




















Join Our Whatsapp Group