पिंपळे सौदागर (Pclive7.com): पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील अत्यंत वर्दळीच्या भागात असलेल्या टेस्ट ऑफ इंदौर या कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात नागरिकांची मोठी पळापळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली, तरी काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, या घटनेत एक धक्कादायक बाब समोर आली असून, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात काही गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा कसा ठेवण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जर आगीत सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. संबंधित परिसर हा अत्यंत रहदारीचा असल्याने अशा ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून कारखाने चालवले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group