पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी काढण्यात आलेल्या GeM निविदा क्रमांक GEM/2026/B/7797530 मधील 1000 MA डिजिटल रेडिओग्राफी (Digital Radiography) सिस्टम खरेदीवरून वाद निर्माण झाला आहे. या मशीनसाठी महापालिकेने 2 कोटी 77 लाख 56 हजार रुपये इतके अंदाजपत्रकीय मूल्य निश्चित केल्याने त्याच्या दराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन संबंधित निविदा प्रक्रिया तातडीने स्थगित करून रद्द करण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाघेरे यांनी दिलेल्या पत्रानुसार, निविदेतील तांत्रिक तपशीलाशी संबंधित मूळ उत्पादक कंपनीने राजस्थानमधील कोटा वैद्यकीय महाविद्यालयाला याच प्रकारचे 1000 MA क्षमतेचे मशीन सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांना पुरविले आहे. तसेच याच वर्षात 800 MA क्षमतेचे मशीन सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांना विकण्यात आल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, इतर शासकीय संस्थांमध्ये 1000 MA मशीनची खरेदी सुमारे 1.40 कोटी रुपयांत झालेली असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याच क्षमतेच्या मशीनसाठी तब्बल 2.77 कोटी रुपयांचे अंदाजित मूल्य कशाच्या आधारावर निश्चित केले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तांत्रिक अटींवरही आक्षेप..
संबंधित निविदेतील तांत्रिक अटी व स्पेसिफिकेशन्स काही विशिष्ट कंपन्या अथवा पुरवठादारांना अनुकूल ठरतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला आहे. त्यामुळे निविदेतील प्रत्येक तांत्रिक निकष, अंदाजपत्रकीय दर आणि बाजारभाव निश्चितीची प्रक्रिया यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित उत्पादक कंपनीच्या काही सरकारी संस्थांमधील विक्री व्यवहारांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेने खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि दक्षता बाळगावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्न..
महापालिकेच्या सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपयांची खरेदी होत असल्याने निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, स्पर्धात्मक आणि बाजारभावाच्या आधारे असणे आवश्यक असल्याचे वाघेरे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सदर निविदा तात्काळ स्थगित करून रद्द करावी, संबंधित मशीनचे पूर्वीचे शासकीय खरेदी दर तपासावेत आणि नव्याने बाजारभाव निश्चित केल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि 2.77 कोटी रुपयांच्या अंदाजित दरामागील कारणे काय आहेत, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group