ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी अजिंक्य उबाळे फाउंडेशनचा पुढाकार; ३०० ज्येष्ठ नागरिकांना सुलभा उबाळे यांच्या हस्ते NCMC प्रवास सवलत कार्डचे वाटप
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड काढण्यासाठी भर उन्हात चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची माहिती मिळाली. ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, या उद्देशाने अजिंक्य उबाळे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या परिसरातच NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सुलभपणे प्रवास करता यावा, यासाठी भविष्यातही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केले.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ अधिक सुलभतेने घेता यावा, यासाठी अजिंक्य उबाळे फाउंडेशनच्या वतीने ३०० ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत NCMC कार्डचे वाटप करण्यात आले. मुक्ताई गार्डन येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या हस्ते या कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड काढण्यासाठी नेहरूनगर येथील बस आगारात जावे लागत होते. तेथे कार्ड मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात आल्यानंतर सुलभाताई उबाळे यांच्या संकल्पनेतून अजिंक्य उबाळे फाउंडेशनने ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.

या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना बस आगारात जाऊन तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज भासली नाही. एकाच ठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ३०० ज्येष्ठ नागरिकांना NCMC प्रवास सवलत कार्ड देण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गजानन ढमाले, तसेच शशिकला उभे, नयना पारखे, संगीता टुपले, अंकुश जगदाळे यांच्यासह अजिंक्य उबाळे फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करून त्यांना उपलब्ध असलेल्या प्रवास सवलतींचा लाभ सहजपणे मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ आवाज न उठवता, प्रत्यक्ष कृतीतून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


















Join Our Whatsapp Group