पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी-जांबे येथील विटभट्टीवरील मातंग समाजाचा मजूर त्याच्या कुटुंबासह जेवण करून, बसल्याचा राग मनात धरून, मजुराला बेदम मारहाण करत, मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी जांबे गावात घडली आहे. याबाबत अण्णाभाऊ साठे महमंडळाचे अध्यक्ष व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के पज्ञनाभन व व उपायुक्त मकरंद रानडे यांची भेट घेऊन, त्यांना मातंग समाजाचे सुनील पवळे यांच्या कुटुंबास झालेल्या मारहाण कृत्याचा तपास योग्य रितीने करुन, आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्यात बापू घोलप, पिंपरी चिंचवड भाजपा अनुसूचित सेलचे अध्यक्ष मनोज तोरडमल, दीपक चखाले, सागर गायकवाड, भानुदास नेटके, अमोल कुचेकर, किशोर हातागळे, मयूर लोंढे, राजू आवळे, सचिन अडगळे, बाळासाहेब शिंदे, जयंत गायकवाड, मनोज मातंग, दिनकर तेलंग, बापु पाटोळे, सचिन कुचेकर, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे जांबे, ता. मुळशी, जि. पुणे येथील आरोपी संदीप पवार यांच्या विटभट्टीवर मजुरी काम करणारे फिर्यादी सुनील पवळे, मुळ गाव पाश्रुड, ता. भूम, जि. उस्मानाबाद येथील गरीब कुटुंब पोट भरण्यासाठी जांबे येथे सदरील आरोपींच्या विटभट्टीवर काम करत असताना, आरोपीने सदर कुटुंबास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करून, फिर्यादी सुनील पवळे यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले आहे. तसेच अश्लील शिवीगाळ करून, त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरुन या कुटुंबाचे अतोनात हाल केले आहेत.
तरी सदरील आरोपी हे धनदांडगे असून, या कुटुंबावर दहशत करून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तरी आपण या प्रकरणाचा सखोल तपास करुन, सत्य परिस्थिती वस्तुजन्य पुरावा इ. माहिती घेवून, सदरील आरोपींना कठोर शासन करावे. जेणेकरून अशा घटकांची पुनरावृत्ती होणार नाही, असे या निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group