पार्थ पवारांच्या प्रचारार्थ मनसेची संवाद सभा
कर्जत (Pclive7.com):- सध्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत किंगमेकरच्या भूमिकेतून मताधिक्य असलेल्या राजकीय पक्षांपैकी मनसे, शेकाप आणि भारतीय काँग्रेसकडे पाहिले जात आहे. कर्जत-खालापूरमध्ये मनसेने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिला असल्याने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कर्जत-खालापूरमधून कार्यकर्त्यांची मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने कार्यन्वित असून जिल्हाध्याक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रभावीपणे काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ठामपणे राहत आघाडीला पाठिंबा दिल्याचे सर्वश्रुत आहे.
मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरसावले आहेत. याच राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करत मनसे पदाधिकाऱ्यांनी आज पार्थ पवारांच्या प्रचारार्थ खोपोली येथे संवाद सभेचे आयोजन केले होते. त्याला सर्व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या संवाद सभेत पार्थ पवारांना मनसेची संपूर्ण ताकद देण्याचा मानस करण्यात आला.
यासंदर्भात मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले की, आम्ही राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने काम करतो. त्यामुळे कोणत्याही इतर पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा आम्ही देऊच शकत नाही. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनाच आमचा पाठिंबा असेल. कर्जत- खालापूर या ठिकाणी अधिकाधिक मताधिक्य पार्थ पवारांना देण्यासाठी सर्वच मनसैनिक एकजुटीने काम करतील.
यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला हटविण्यासाठी आवाहन केले आहे. मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठीच राज ठाकरे यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला आहे. स्थानिक प्रश्न मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहेत की जे मागील 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र विश्वास ठेवा मी निवडून आल्यानंतर एकही स्थानिक प्रश्न प्रलंबित राहणार नाही. यापुढे जर प्रश्न सुटले गेले नाही तर ती माझी जबाबदारी असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारला बाहेर काढायचा आहे. सर्व पक्षात युवकांमध्ये खूप उत्साह आहे. या निवडणुकीत राजसाहेब नक्कीच चमत्कार करून दाखवणार याची मला खात्री आहे.






















Join Our Whatsapp Group