येत्या विधानसभेला नव्या चेहऱ्यांला संधी मिळणार असल्याचे शरद पवारांचे संकेत
भोसरी (Pclive7.com):- विकास कामे करूनही पराभव झालायं. त्यामुळे आम्हाला तपासलं पाहिजे कुठं चुकलोयं. लोकांना बदल हवा असतो. उमेदवार म्हणून दिलेले, तेचतेच चेहरे लोकांना नको असतात. जनमाणसांत भावना वेगळी झालेली असते. ते नव्या चेहऱ्यांना जनता स्विकारतात. आता येत्या विधानसभेला काही महिनेच राहिलेत. यावेळी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांला संधी मिळावी यासाठी मी स्वत: आग्रही असल्याचे सांगत भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतच नव्हे तर संपूर्ण राज्यात नव्या उमेदवारांना रिंगणात उतरविणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे माजी आमदार विलास लांडे आणि आण्णा बनसोडे हे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यादाच शरद पवार पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भोसरीत त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभेच्या उमेदवारीबाबत यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचपणी केली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, तसेच नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शहराध्यक्षांनी लवकरात लवकर बैठक घेऊन नियोजन करावे. प्रत्येक मतदारसंघात मतदारांच्या घरोररी जाऊन भेटी घ्याव्यात. उमेदवारी जाहिर होण्याची वाट न पाहता निवडणुकीची तयारी सुरू करावी. येत्या अडीच महिन्यात दुसरं काही करायचं नाही. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीनही जागा निवडून आणायच्या आहेत. लोकांचा विश्वास संपादन करावा. मतदार आणि समाज मोठ्या मनाचा असतो. काही चुकलं असेल तर जनता नक्कीच माफ करेल. उमेदवारांची निवड तुम्ही सर्वजण बसून करा. माझा आग्रह आहे नवीन चेहरे दिले गेले पाहिजेत, नक्कीच विजय होईल असा विश्वास शरद पवार यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत भोसरीतून माजी आमदार विलास लांडे तर पिंपरी विधानसभेतून माजी आमदार आण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीकडून तीव्र इच्छुक आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे सूचक विधान शरद पवार यांनी केल्यामुळे हे दोन्ही माजी आमदार अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान भोसरीतून विरोधी पक्षनेते दत्ता साने, अजित गव्हाणे यांची नावे चर्चेत आहेत. तर पिंपरीतून शेखर ओव्हाळ, सुलक्षणा शिलवंत-धर हे तीव्र इच्छुक आहेत. आता राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेणार? नव्यांना संधी देणार की, जुन्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. परंतू पवारांच्या या वक्तव्यांमुळे नव्या चेहऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याच पहायला मिळत आहे.






















Join Our Whatsapp Group