पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ. लक्ष्मण जगताप, खा. अमर साबळे, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, अमोल थोरात, एकनाथ पवार, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, माऊली थोरात, बाबू नायर, संजय मंगोडेकर, विजय फुगे, शैला मोळक, आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले, “भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले असताना दुसरीकडे कर्जमाफी योजना म्हणून फसव्या योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
आता या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर पिंपरी-चिंचड शहर भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी सांगितले.