पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी (दि. २४) भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी भेट देऊन लांडे कुटुंबियांचे सांत्वन केले. जयंत पाटील हे सुमारे एक तास लांडे यांच्या घरी होते.
विलास लांडे यांच्या मातोश्री इंदूबाई विठोबा लांडे यांचे ६ मे रोजी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाच्या संकटामुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लांडे यांच्या मातोश्रीवर भोसरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातील राजकीय व अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विलास लांडे यांना दूरध्वनी करून त्यांचे सांत्वन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील फोन करून विलास लांडे यांचे सांत्वन केले होते. तसेच यावेळी झालेल्या गप्पांमध्ये लांडे यांच्या वडीलांचे वय १०२ वर्षे असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांनी मग त्यांना भेटावे लागेल, अशी भावना व्यक्त केली होती. विलास लांडे यांचे वडील विठोबा लांडे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती थोडी सामान्य झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी आज (रविवार) माजी आमदार विलास लांडे यांच्या भोसरीतील घरी भेट दिली. त्यांनी लांडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच लांडे यांचे वडील विठोबा लांडे यांच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्यास सांगितले. जयंत पाटील हे सुमारे एक तास लांडे यांच्या घरी होते. यावेळी विलास लांडे यांचे बंधू व माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, लांडे यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे, मुलगा व नगरसेवक विक्रांत लांडे तसेच लांडे कुटुंबियांतील सर्व सदस्य उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group