पिंपरी (Pclive7.com):- कर्करोगाच्या शस्त्रक्रियेला अवघा एक महिना झाला असताना कोरोना नावाची महामारी आली. तसेच कुटुंबाला पहिल्यांदाच सांगितले माझ्यासाठी माझे कर्तव्य पहिले. त्यासाठी मला तुमच्यापासून व मुलापासून कदाचित लांब रहावे लागेल. हे क्षेत्र निवडताना “सेवा परमो धर्म” ही शपथ पहिली घेतली होती. त्यामुळे “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” हेच ब्रीद सांभाळत पिंपरीगाव येथील परिचारिका प्रतिभा प्रथमेश जाधव या कोविड योध्या आपली निरंतर सेवा मुंबई महानगरपालिकेच्या सायन हॉस्पिटल येथे देत आहेत.
प्रतिभा जाधव बोलताना म्हणाल्या की, कोरोनामुळे कुटुंबापासून लांब राहत असले तरी इकडे माझी राहण्याची सोय नाही. तसेच रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये जास्त दिवस राहण्याची परवानगी मिळत नाही. तसेच रूम भाड्याने घ्यावी म्हणाल तर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूम मालक खोली भाड्याने देत नाहीत. कुटुंबाची व घरच्या मंडळींची काळजी करू नकोस, असा विश्वास पती प्रथमेश जाधव यांनी व परिवाराने कायम दिला. कर्तव्य श्रेष्ठ मानत मी रुग्णसेवा करण्याचे कर्तव्य निभावते, याबद्दल त्यांना अभिमान आहे. माझ्यामुळे घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी गेली २ महिन्यांपासून घरापासून लांब आहे. तसेच मला एक तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. त्यात मला कोविड रुग्णांची देखभाल व सेवा करण्यासाठी हजर करण्यात आले.
पेशंटसोबतचा अनुभव..
कोविड कक्षामध्ये काम करताना जातीभेद किंवा स्पेशल रुग्ण असा भेदभाव नसतो. प्रत्येक रुग्णाला सारखीच सेवा मिळते. काही रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातात, तर काही रुग्ण बरे होण्यास जरा जास्त वेळ घेतात. प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे की, आपण किती लवकर आपल्या शरीरामधून कोरोनाला बाहेर काढतो. खूप दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे आणि नातेवाईक भेटत नसल्याने रुग्णांची मानसिकता खूप बदलून जाते. ते खूप चिडचिडे होतात. त्यांना तेवढ्याच आपुलकीने सांभाळायचं असतं. जेव्हा कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळत असते तेव्हा ते खूप खुश असतात. त्या नादात ते खूप उतावीळ वागतात आणि दुसऱ्यांच्या विचार न करता वागतात. त्यावेळी त्यांना समजून सांगणे ही खुप मोठी जबाबदारी आमची असते.
पी.पी.ई. किटमधला अनुभव..
पी.पी.ई. किटमधला अनुभव हा खूपच वेगळा आहे. किट घालण्यापासून ते काढण्यापर्यंत खूप सावधगिरी बाळगावी लागते. आपण पूर्णपणे सुरक्षित झालो आहोत, याची खात्री झाल्यानंतरच रुग्णांजवळ जावं लागतं. या किटमध्ये श्वास घेणं सुद्धा खूप कठीण असते. संपूर्ण शरीर घामाने भिजून जाते आणि अश्या अवस्थेत स्वतःच्या डोक्यावर बर्फ ठेऊन रुग्णांना सेवा द्यायची असते. खूप कठीण परिस्थिती आहे परंतु सोबत काम करणारे डॉक्टर असो वा सफाई कामगार सर्वच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. एकमेकांना साथ देऊनच आम्ही काम करतो. किट काढताना सुध्दा आपल्या शरीराला स्पर्श न होता काढावे लागते, नाहीतर विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या महामारीतून निश्चितच आपण बाहेर पडणार आहोत. यासाठी सरकारी निर्देशांचे पालन करीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत राहिले पाहिजे. आजच्या या घडीला आपण सर्व एक आहोत, या भावनेतून सर्वांची काळजी करीत एकमेकांना सहकार्य देत यातून आपण बाहेर येणार, हा ठाम विश्वास आम्हा सर्व परिचरिकांना आहे, असेही प्रतिभा जाधव म्हणाल्या.
























Join Our Whatsapp Group