पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लसीकरण केंद्र आज लसी अभावी बंद होती. त्यामुळे सकाळपासून वाट बघत असलेल्या नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले आहे. १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तरी महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून लसीकरणाचा कृती आराखडा जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात एकूण १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र आहेत. त्यात पालिकेच्या ६० आणि खाजगी २९ केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरु आहे. परंतु आज (दि.२७) केवळ १९ केंद्र चालू असून इतर केंद्र लसी अभावी बंद आहेत. चौकशी केल्यानंतर लसीची उपलब्धता नसल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारने १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केलेले आहे. महापालिका १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देणार आहे. असे असताना आज आपल्याकडे लसीचा साठा कमी पडत आहे. त्यामुळे आपण पुढे नियोजन कसे करणार ? दरम्यान महापौर माई ढोरे यांनी नुकतेच पुढील महिन्यात १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केलेले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना सत्ताधारी भाजप व महापौरांनी जाहीर केलेले उद्धिष्ट आपण कसे साध्य करणार आहोत?
आज लसीकरण केंद्र दुपारी लसी अभावी बंद करावी लागतात, किंवा मोठ्या प्रमाणात पूर्णपणे बंद ठेवावी लागतात. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुर्तास कठोर निर्बंधाबरोबर लसीकरण करणे हा महत्वाचा पर्याय आहे. तरी सर्व लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल अशा प्रकारचे नियोजन करून लसीकरणाचा कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group