पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/11/satyam-diwali-offer-1000-x-1000.jpg)
सभापतीपदासाठी येत्या शुक्रवारी (दि.१२) दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.
महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार कामकाज पाहणार आहेत.
महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत दि.२० ऑक्टोबर २१ रोजी झालेल्या महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
महापालिकेतील तौलनिक पक्षीय बलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्यांची प्रत्येक विषय समितीत निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित आहे.