पिंपरी (Pclive7.com):- मुख्य रस्ते, महामार्ग, बीआरटी रोड आणि 18 किलोमीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी दोन महिन्याकरिता घाईघाईने 24 लाख 96 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. निकोप पद्धतीने स्पर्धा होऊन निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली. एखादी कंपनी, ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्याची निविदा काढून महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी, अपव्यय करु नये अन्यथा न्यायालयायात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
याबाबत महापौर उषा ढोरे यांना पत्र दिले. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरातील प्रमुख रस्त्यांचे यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाईचा विषय प्रशासकीय मान्यतेसाठी सभेसमोर ठेवण्यात आला. शहराचे दोन भाग करुन 331 किलोमीटर व 339 किलोमीटर असे एकूण 670 किलोमीटर रस्त्यांची साफसफाई यांत्रिकीकरणाद्वारे करण्यात येणार आहे. हा विषय मागील 6 ते 8 महिन्यांपासून वारंवार तहकूब असताना महापालिकेने 13 जानेवारी 2022 रोजी शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बीआरटीरोड व 18 किलोमीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी दोन मगिन्याकरिता घाईघाईने 24 लाख 96 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियामक मार्गदर्शक तत्वानुसार कोणतीही निविदा सूचना जारी केल्यानंतर निविदेचा अंतिम दिनकांची किमान 21 दिवस मुदत असावी. निविदा केवळ सात दिवसाच्या मुदतीने काढल्याने नियमाचे उल्लंघन आहे. अंतिम दिनाकांच्या आधी सर्व निवेदनधारकांची निविदापूर्व बैठक बोलविणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही कायदेशीर बाब आहे. निविदा जारी केल्यानंतर अंतिम दिनांकाच्या किमान सात दिवस आधी निविदा पूर्व बैठकीचे शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे असताना यांत्रिकी पद्धतीने साफसफाईची निविदा संशयास्पदरीतीने घाईघाईने फक्त सात दिवसात काढली. निविदा पूर्व बैठक वगळण्यात आली. ही गंभीर अनियमितता असून असे करण्यात विशिष्ट निविदाधारकाला झुकते माप देण्याचा अधिका-यांचा संशयास्पद प्रयत्न दिसून येत आहे.
कोणत्याही यंत्रसामुग्रीकरिता काडलेल्या निविदेत यंत्रांची टेक्कनिकल स्पेसिफिकेशन असणे ही कायदेशीर बंधनकारक बाब आहे. अन्यथा निवेदन धारकांची देयक बोली त्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या यंत्रणानुसार वेगवेगळे येऊन दरपत्रक चुकते. या निविदेत रस्ते स्वच्छता यंत्रांची कुठलीही टेक्किनिकल स्पेसिफिकेशन नाहीत. निविदेतील ही तांत्रिक अनियमितता असून गंभीर बाब आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाचे कारण पुढे करुन रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी दोन महिन्याची निविदा काढून विशिष्ट ठेकेदारांची रस्ते झाडणारी यंत्रे महापालिकेला लावण्याचा अधिका-यांचा डाव आहे. या दोन महिन्याच्या घाईघाईने काढलेल्या निविदा प्रक्रियेत झालेला गोंधळ लक्षात घेता आणि नागरिकांच्या कर रुपाने पैशाचा होणारा अपव्यय पाहता ही निविदा रद्द करावी. कॅक सारख्या नामवंत संस्था अंगिकारित असलेल्या क्यू.सी. बी.एस पद्धतीने या विषयाची निविदा काढून ती तातडीने अंमलबजावणी करुन राबवावी अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली.























Join Our Whatsapp Group