पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१७-२२ या पंचवार्षिकेचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या नव्या सभापतीस १ ते १३ मार्च असा केवळ १३ दिवसांसाठी खुर्ची मिळणार आहे. मात्र, निवड प्रक्रिया व साप्ताहिक सुट्टी जाता प्रत्यक्ष ५ दिवसांचा कालावधी मिळेल. त्यामुळे स्थायी सभापतीपदी नवीन सदस्याला संधी मिळणार की, विद्यमान सभापतीच कायम राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीचा चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीचे सदस्य होण्यास सर्वच नगरसेवक खूपच उत्सुक असतात. या समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व १६ पैकी ८ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे.
शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बोर्डे, भीमाबाई फुगे (सर्व भाजपा), पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस) याचा दोन वर्षांचा सदस्याचा कार्यकाळ संपत आहे. तर, समितीचे अध्यक्ष अॅड. लांडगे, सुजाता पालांडे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे (भाजप), मीनल यादव (शिवसेना), प्रवीण भालेकर, राजू बनसोडे (राष्ट्रवादी), नीता पाडाळे (अपक्ष) हे ८ सदस्य कायम राहणार आहेत.
महापालिका नियमानुसार नव्या आठ सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. ते सदस्य १ मार्चपासून समितीचे सदस्य होतील. तर, अध्यक्षपदासाठी अर्ज मागवून निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल. ती प्रक्रिया पूर्ण होऊन ७ मार्चला अध्यक्षाची निवड होईल. त्यानंतर १३ मार्चपर्यंत नव्या अध्यक्षाला कामकाज करता येणार आहे.
मात्र, १२ मार्चला शनिवार व १३ मार्चला रविवार असल्याने ते दिवस वगळून केवळ पाच दिवस नव्या अध्यक्षाला प्रत्यक्ष कामकाज करता येणार आहे. त्या कालावधीत एक साप्ताहिक सभा व एक विशेष सभा घेता येईल. या अल्प कालावधीसाठी कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते ते पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.
राज्य शासनाचे मार्गदर्शन घेणार – नगरसचिव
सध्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. महापालिका १३ मार्च २०२२ ला वरखास्त होत आहे. एक ते १३ मार्च या केवळ १३ दिवसांच्या कालावधीसाठी स्थायी समितीच्या ८ नव्या सदस्यांची निवड व अध्यक्षाची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शन घेतले जाईल. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.