पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर व एचडीएफसी बँकेच्या स्टार्टअप सेलसोबत आज सामंज्यस करार करण्यात आला. एचडीएफसी बँक स्थानिक इकोसिस्टममधील स्टार्टअपबद्दल समान दृष्टीकोन सामायिक करण्यात आले आहे. त्यामुळे स्टार्टअपला अधिक कार्यक्षमतेने समर्थन देण्यासाठी हा सामंजस्य करार एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल. सदर सामंजस्य कराराद्वारे पिंपरी चिंचवड इन्क्युबेशन सेंटरला एचडीएफसी बँक स्टार्टअप- संबंधित उपक्रमांमध्ये फायदा मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे.
ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे झालेल्या बैठकीत एचडीएफसी बँकेकडून रिटेल बँकिंग पश्चिम क्षेत्र प्रमुख अभिषेक देशमुख, रिटेल बँकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष परिमल रमैया यांनी तर स्टार्टअप इन्क्युबेशनमार्फत स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, संचालक व्यवस्थापक किरण वैद्य यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी, एचडीएफसी बँक स्टार्टअप सेलचे अभिषेक श्रीवास्तव, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मासरे उपस्थित होते. सद्यस्थितीत स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमधील हा विसावा सामंजस्य करार आहे.