पिंपरी (Pclive7.com):- बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पिंपरी-चिंचवड शहरात आपला विस्तार करण्यासाठी जोरात प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने शहरात कार्यालय बांधण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्यावतीने जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. जागा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पुणे कार्यालयात रितसर अर्ज करण्यात आला आहे.
शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर व आता रितसर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नामकरण मिळाल्यानंतर कार्यालयासाठी जागा शोधण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील काही पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांच्याबरोबर प्रवेश केला आहे.
पक्ष म्हटला की पदाधिकारी, कार्यकर्ते आले व त्यांना बसण्या, उठण्यासाठी कार्यालयाची गरज आलीच. त्यानुसार शहरात आपला विस्तारकरण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेने (शिंदे गटाने) चिंचवड येथील जुना जकात नाक्या जवळील खासदार बारणे यांच्या खासगी प्रकल्पाच्या जागेत एक ते दीड हजार चौरस फुटाचे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) कडून मिळत आहे.
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी कार्यालयास जागा मिळावी म्हणून एमआयडीसीच्या पुणे कार्यालयात अर्जही केला आहे. नविन पक्ष असल्याने कार्यालयासाठी जागेची गरज आहे. जागा उपलब्ध असल्यास आम्ही सूचवितो, असे एमआयडीसीच्या वतीने त्यांना सांगण्यात आले आहे.