चिंचवड (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा आज (दि.२४) चिंचवड मधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. याची सुरवात त्यांनी सकाळी ९.३० वाजता चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन केली.
याप्रसंगी अजितदादांनी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला सुख-शांती-समृध्दी आणि निरोगी आयुष्य लाभावे. तसेच वरुणराजाची कृपा होऊन बळीराजा सुखात नांदावा व महाराष्ट्र राज्याची सर्व क्षेत्रात उत्तम प्रगती व्हावी हा संकल्प सोडत श्री मोरया गोसावी चरणी अभिषेक करून आरती केली. श्री मोरया गोसावी महाराजांच्या समाधीला प्रदक्षिणा घालत असताना चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांनी अजितदादांना मोरया गोसावी यांच्या जीवन चरित्रा विषयी थोडक्यात धार्मिक आणि ऐतिहासिक माहिती दिली.
याप्रसंगी श्री मोरया गोसावी महाराजांचे वंशज व चिंचवड देवस्थानचे विश्वस्त क्रमांक २ जितेंद्र देव, आणि निरंजन देव, अभिषेक देव, ऋषिकेश देव तसेच श्री मोरया गोसावी देव मंडळाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र देव आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, अपर्णा डोके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक ॲड.संदीप चिंचवडे, राजाभाऊ गोलांडे, जयहिंद बँकेचे संचालक राहूल भोईर, आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे कारभारी किशोर जोशी हे मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे विश्वस्त क्रमांक २ जितेंद्र देव यांच्या हस्ते अजितदादांना शाल, श्रीफळ, मोरयांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर म्हणा मंगलमूर्ती मोरया या नाम गजरात अजितदादांनी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.