पिंपरी (Pclive7.com):- दिवसेंदिवस विकसित होत असलेल्या पिंपळे सौदागर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विरंगुळा केंद्र त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोडवरील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर संघटनेचे अध्यक्ष विलास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या या संघटनेमध्ये पाचशेच्यावर सदस्य संख्या असून सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हे सर्व कार्यक्रम क्रीडांगणावर तसेच उद्यानांमध्ये उघड्यावर घ्यावे लागतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. शिवाय संघटनेचे वाचनालय आहे. त्यातील पुस्तके, तसेच पन्नास खुर्च्या, टेबल, साउंड सिस्टीम इत्यादी सामान असून त्याची देखभाल ठेवण्यासाठी जागा नाही. वैयक्तिक जबाबदारीवर हे सर्व सामान सांभाळताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महानगरपालिकेने विरंगुळा केंद्र उपलब्ध करुन देण्यात यावे अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली.
संघटनेत नव्याने दाखल झालेल्या सभासदांचे यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संघटनेचे कोषाध्यक्ष विवेकानंद लिगाडे यांनी आर्थिक व्यवहाराची माहिती देऊन लेखाजोखा मांडला. बैठकीच्या निमित्ताने शशिकांत कुलकर्णी, नीता गुप्ता, विजया तुग्नावत, डी.बी. कडते, उषा भागवत, वसंतकुमार तेलंग, सुरेंद्र पागेदार, सुरेश तांबोळी, भारती पाटील, सुरेखा पाटील यांनी विविध गाणी सादर केली. उमेश धूत यांनी नाटकातील संवाद साभिनय सादर केले. सुत्रसंचलन श्रीकृष्ण निलेगावकर यांनी केले. आभार अनिल कुलकर्णी यांनी मानले. या बैठकीस सखाराम ढाकणे, रमेश चांडके, राजेंद्र देशमुख, अशोक वारकर या पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

























Join Our Whatsapp Group