पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेला २ कोटी ४२ लाख ५९ हजार ३६१ रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकाला परत केला आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. यात २१ लाखांचे ४८ तोळे सोन्याचे दागिने, २५ लाखांची दोन महागड्या चारचाकी, ८ लाखांच्या २२ दुचाकी, १४ लाख ८८ हजारांचे ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण दोन कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरी गेलेले मोबाईल, दुचाकी, चारचाकी, सोन्याचे दागिने, लॅपटॉप हे मूळ मालकांना परत केले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल देण्यात आला.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे संकल्पनेतून हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला. यावेळी एकुण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
या कार्यक्रमात संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकुण ४८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची एकुण किंमत रु.२१,३७,१४०/- तसेच २ चारचाकी वाहने किमत रु.२५,५०,०००/-, २२ मोटारसायकल किंमत रु.८,७०,०००/-, ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन किंमत रु.१४,८८,८९०/- विविध कंपन्यांमधुन चोरीस गेलेला मुद्देमाल व ३ लॅपटॉप एकुण किंमत रु.१,२३,१८,६८१/- तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम रु.४८,९४,०००/- असा एकुण रक्कम रु. २,४२,५९,३६१/- (दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकसष्ट रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यकाळात दुस-यांदा हा कार्यक्रम पार पडला. यापुर्वी दि.१० जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधुन वेगवेगळ्या ८४ गुन्ह्यांतील सुमारे १,४६,९३,७०५/- (एक कोटी सेहचाळीस लाख त्र्यान्नव हजार सातशे पाच रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची प्रस्तावना अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रसंगी फिर्यादींना उद्देशून तुमच्या चेह-यावरचा आनंद पाहून पोलीस अधिकारी म्हणून आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली. तसेच यापुढे देखील असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील जेणे करुन जनतेचे मनोबल वाढेल व अधिकाधिक फिर्यादी पुढे होवनु पोलीसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील असे मनोगत व्यक्त केले. तसेच ज्या पोलीस अधिका-यांनी सदर गन्ह्यांचा तपास करुन मुद्देमाल हस्तगत केला त्यांचे अभिनंदन देखील केले. तसेच सह पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पोलीस अधिका-यांचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्यांना आपला मुद्देमाल परत मिळाला अशा काही फिर्यादींनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी विनयकुमार चोबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त व श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे -१ व विवेक मुगळीकर, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त, एमआयडीसी भोसरी विभाग, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, अनिल कोळी, सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग हे उपस्थित होते.