सांगवी (Pclive7.com):- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणत आरती राव यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. तसेच वाचन आपल्याला संवादकौशल्य सुधारण्यात मदत करते. योग्य शब्दसंपदेमुळे वाक्यरचनेची समज वाढवते. वाचनामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
प्रणव राव यांनी डॉ. कलाम यांचा ‘स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडते, तर खरे स्वप्न ते असते जे तुम्हाला झोपूच देत नाही, हा विचार सांगून विद्यार्थ्यांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगितले. मुख्याध्यापिका आशा घोरपडे यांनी अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन आपल्या प्रशालेतील एक तरी विद्यार्थी त्यांच्यासारखा महान वैज्ञानिक व्हावा, अशी आशा व्यक्त केली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध पुस्तकांचे वाचन घेण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका प्रिती पितळे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group