वाकड (Pclive7.com):- प्रत्येक महिन्याला दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांकडून ८० लाख २७ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात ते २६ नोव्हेंबर पर्यंत वाकड येथील इराणी कॅफे येथे व ऑनलाईन माध्यमातून घडली.
प्रसन्न यशवंत बालवडकर (वय २६, रा बालेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल खुराणा, अविनाश सिंग, रवि ठाकुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन फिर्यादी यांना ते ओरीस कॉइन कंपनीचे भारतातील प्रमुख असल्याचे भासवले. ऑनलाइन ओरीस कॉईन ही क्रिप्टो करन्सीची कंपनी असल्याचे सांगून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्क्यांनी ५ वर्ष परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी तसेच फिर्यादी यांचे भाऊ शिवम बालवडकर यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या वेबसाइटवर आयडी तयार केले.
फिर्यादीस २५ लाख ३० हजार रुपये व त्यांचे भाऊ शिवम बालवडकर यांना ५४ लाख ९७ हजार ५०० रुपये असे एकूण ८० लाख २७ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर भरण्यास भाग पाडले. त्याचा परतावा न देता त्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली.