पुणे (Pclive7.com):- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज आंब्याची आरास साकारण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गणपती मंदिरात ही आंब्याची आरास साकारण्यात आली. तब्बल ११ हजार आंब्यांची आरास साकारत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी अक्षय्य तृतीयेला अशाप्रकारे आरास साकारण्यात येते. आज पहाटेपासूनच मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ ते ६ या कालावधीत गणपतीला स्वराभिषेक करण्यात आला. गायक संजीव मेहेंदळे यांनी गणपतीची भजने गात उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश याग करण्यात आला.
विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्या वतीने रात्री ९ वाजता भजनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. आज दिवसभर भाविकांना आंब्याची ही आरास पाहायला मिळणार आहे.