पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी स्वत:चा खाजगी स्पिकर आणला होता. मात्र महापौर नितीन काळजे यांनी हा स्पिकर सभागृहात ठेवण्यास विरोध दर्शविला. साने यांनी सुरूवातीला नकार दिला. मात्र महापौरांनी विनंती वजाआदेश दिल्याने स्पिकर बाहेर काढण्यात आला. त्यामुळे पालिका सभागृहात राष्ट्रवादीचा ‘आवाज’ घुमलाच नाही.
पिंपरी महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली, तर राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. तेव्हापासून महापालिका सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत होते. त्यावर पर्याय म्हणून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचा ‘आवाज’ सभागृहात घुमवण्यासाठी स्वत:चा खाजगी स्पिकर बंद बँगमधून सभागृहात आणला होता. त्याला महापौर नितीन काळजे यांनी विरोध दर्शविला.
दत्ता साने म्हणाले, गेल्या वर्षभरात विरोधकांना अनेक चांगले-वाईट अनुभव आलेत. विरोधी पक्षातील नगरसेवकांना जाणिवपूर्वक बोलू दिले जात नाही. सत्ताधारी आमचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आम्ही स्वतंत्र स्पिकर सभागृहात आणला आहे. गरज पडेल तेव्हा आम्ही या स्पिकरचा वापर करू.
महापौर काळजे म्हणाले, सभागृहात स्पिकर आणणे हे नियमबाह्य आहे. कुणाचाही आवाज आम्ही दाबत नाही. सभागृहात सर्वांना बोलू दिले जाते. उद्या एखादा नगरसेवक टु व्हिलर घेऊन सभागृहात येईल. त्यामुळे साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवावा. अखेरीस साने यांनी तो स्पिकर सभागृहातून बाहेर पाठवला.