पिंपरी (Pclive7.com):- आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात येणा-या वारक-यांना अधिक सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी सजग राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.
भक्ती शक्ती परिसर व आकुर्डी गावठाण येथील विठ्ठल मंदिराच्या मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी केली त्यावेळी अधिका-यांना त्यांनी या सूचना केल्या. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्य जावेद शेख, प्रमोद कुटे, नगरसदस्या मिनल यादव, वैशाली काळभोर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, विशाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. ६ जुलै रोजी आगमन होणार असून आकुर्डी येथे मुक्काम असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन दि. ७ जुलै रोजी होणार आहे.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या समन्वयाने आषाढीवारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्याबाबत तसेच पालिकेच्या सर्व संबधित अधिका-यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडून या सोहळ्यात सहभागी वारक-यांना सुविधा देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.