तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे येथे एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थांची बेकायदा बाळगताना पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एमडी, मोबाईल फोन आणि कार असा २४ लाख ४७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी ओम रविंद्र आभाळे (वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. ६२, कृष्णाराव भेगडे शाळेसमोर, मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी रात्री १०.३५ वाजता इंद्रयणी लेन क्र.४, मनोहरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून २९ हजार रुपये किंमतीचे ३९.८९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ, २० लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची एमजी हेक्टर कार, तसेच ७५,००० रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २४ लाख ४७ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगत, साठवणूक व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group