पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. आज दुपारी अजित पवार, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यात पुण्यातील एका बंगल्यावर तब्बल दोन तास गुप्त बैठक पार पडली. दुपारी साडे तीन ते साडे पाच या वेळेत ही चर्चा झाली असून, बैठक झाल्याला दोन्ही बाजूंनी दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा शिक्कामोर्तब झालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये जिथे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे, तिथे मैत्रीपूर्ण लढत द्यावी आणि इतर प्रभागांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी भूमिका या तिसऱ्या बैठकीत मांडण्यात आली. शरद पवार गटाने सुमारे ३० जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला किती जागा येणार, यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे दोन्ही पवार गटांच्या आघाडीवर सध्या तरी शिक्कामोर्तब झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

या बैठकीला अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, नाना काटे हे स्थानिक नेते उपस्थित होते. तर शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे यांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या जिजाई बंगल्यावर पहिली बैठक झाली होती. त्यानंतर आज सकाळी आणि दुपारी अशा आतापर्यंत एकूण तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, या बैठकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात उत्सुकता कायम आहे.






















Join Our Whatsapp Group