पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या महापौर पदासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल झाला आहे. तर उपमहापौर पदासाठी चिंचवडचे सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापौर पदासाठी बरेच राजकीय नाट्य घडले होते. कुणबी विरूध्द माळी असा संघर्ष देखील पेटला होता. मात्र या सर्व घडामोडीनंतर आमदार लांडगे यांनी या निवडीत बाजी मारली आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर राहुल जाधव यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
दरम्यान महापालिका भवनात आमदार लांडगे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.