पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या वुई टुगेदर फाउंडेशन यांच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा वृद्धाश्रम येथे वृद्ध महिला व पुरुषांसाठी मदत उपक्रम आयोजित करण्यात आला.

वुई टुगेदर फाउंडेशन हे गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित, निराधार, अंध, अपंग, गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच दुर्गम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सातत्याने कार्य करत आहे. समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असताना यावेळी फाउंडेशनच्या वतीने सावली निवारा वृद्धाश्रमातील वृद्धांना कपडे, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

सावली निवारा वृद्धाश्रमामध्ये शहरातील विविध भागांतील निराधार वृद्धांचे निशुल्क संगोपन केले जाते. त्यामुळे या आश्रमाला कायम मदतीची आवश्यकता भासत असते. ही गरज लक्षात घेऊन वुई टुगेदर फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला. फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, “या आश्रमातील वृद्ध महिला व पुरुष हे आमच्यासाठी आशीर्वादरूपी दातृत्व आहेत. त्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम तत्पर राहू आणि अशी सेवा आमच्या हातून सातत्याने घडत राहो,” असे मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार कुशाल दुसाने, माजी अध्यक्ष सलीम सय्यद तसेच विलास गटने, रंगाराव कुकाला, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे आदींनी सहभाग घेतला.




















Join Our Whatsapp Group