पिंपरी (Pclive7.com):- विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.

वेळेत अर्ज सादर करणाऱ्या पात्र मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत बीएलओंकडून घरभेटी देत गणना अर्जांचे वितरण व संकलन सुरू आहे. शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव समाविष्ट व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व पात्र नागरिकांनी गणना अर्ज वेळेत भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना म्हटले की, “विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची अंमलबजावणी शहरात नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. बीएलओंना आवश्यक सहकार्य करून नागरिकांनी गणना अर्ज वेळेत सादर करावेत. ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.”

गणना अर्ज वेळेत भरून सादर करणाऱ्या नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या पात्र नागरिकांची नावे समाविष्ट झालेली नसतील किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करावयाची असेल, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून अर्ज करता येणार आहे. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८, तर चुकीच्या अथवा अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उप आयुक्त सचिन पवार म्हणाले की, “पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशीलांची खात्री करावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यक असल्यास नमुना ६, ७ किंवा ८ द्वारे विहित कालावधीत अर्ज सादर करून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात” .
शहरातील सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कोणताही विलंब न करता ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.




















Join Our Whatsapp Group