पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र ७७ उमेदवारांच्या या यादीत पिंपरी, चिंचवडसह भोसरी विधानसभेतील उमेदवारी वेटींगवर ठेवली आहे. उमेदवारीसाठी होत असलेल्या विलंबामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता मात्र कमालीची वाढली असून तीनही ठिकाणी नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राष्ट्रवादीने आज जाहीर केलेल्या यादीत बारामती मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील, हडपसर मतदारसंघातून शहराध्यक्ष चेतन तुपे, खडकवासला मतदारसंघात नगरसेवक सचिन दोडके,पर्वती मतदारसंघात नगरसेविका अश्विनी कदम, वडगावशेरी मतदारसंघात नगरसेवक सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वडगावशेरी मतदारसंघात माजी आमदार बापूसाहेब पठारे प्रबळ इच्छुक होते. राष्ट्रवादीने धक्कातंत्राचा वापर करीत पठारे यांना झटका दिला. तर पुणे ग्रामीण भागातून जुन्नर – अतुल बेनके, आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, शिरूर-अशोक पवार, दौंड-रमेश थोरात, इंदापूर – दत्तात्रय भरणे, बारामती – अजित पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ७७ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.