पिंपरी (Pclive7.com):- आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर त्याचा परिणाम थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर झाला आहेय. येस बँकेमध्ये महापालिकेचे तब्बल ९८३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, त्यामुळे पिंपरी महापालिकेला आता आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी बँक असून देखील महापालिकेने येस बँकेत ठेवी ठेवल्याने याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.
येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि.५) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिकेला देखील पैसे काढता येणार नाहीत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातो.
येस बँक खासगी असल्याचे माहिती असून देखील पिंपरी महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने २०१७ पासून या बँकेत ठेवी ठेवल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील त्याला मान्यता दिली. महापालिकेच्या येस बँकेत सुमारे ९८३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यावर ८.१५ टक्के व्याज मिळत होते. परंतु, येस बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे महापालिकेला मोठा झटका बसला आहे.
महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे. खासगी बँक असूनही ठेवी ठेवल्याच कशा असा सवाल उपस्थित केला जात आहे. याची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर आयुक्तांना द्यावे लागणार आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेने देखील येस बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. परंतु, बँकेची पत खालावताच पुणे महापालिकेने सुमारे ४०० कोटींची रक्कम वेळीच काढून घेतल्या. परंतु, पिंपरी महापालिकेला मात्र शहानपण सुचले नाही. त्यामुळे मोठा झटका बसला आहे.






















Join Our Whatsapp Group