पिंपरी (Pclive7.com):- सध्या राज्यात आणि शहरात कोरोना व्हायरसमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वायसीएम रुग्णालय ‘आयसोलेशन वार्ड’ची व्यवस्था करण्यात आली असून कोरोना व्हायरस बाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी केले आहे.
वायसीएम रुग्णालयात कोरोना व्हायरस संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक विलास मडेगिरी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. निरंजन पाठक आदी होते.
उपाययोजना संदर्भात अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे माहिती देताना म्हणाले की, वायसीएम रुग्णालयात कोरोना व्हायरस संदर्भात उपाययोजना म्हणून आयसोलिशन वार्ड तयार करण्यात आला आहे. या मध्ये ८ बेडची व्यवस्था असून ४ महिला आणि ४ पुरुष बेड आहेत. शहरात जनजागृतीसाठी १६५ ठिकाणी माहिती फलक, दिड लाख माहिती पत्रकांचे वाटप सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये एन.९५ ट्रीप्पल लेयर मास्क मुबलक प्रमाणात आहे. नागरिकांनी प्राथमिक काळजी म्हणून हस्तांदोलन टाळावे, शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा, असे आवाहनही डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group