पिंपरी (Pclive7.com):- औंध ते काळेवाडी रस्त्यावर साई चौक येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. भाजपाकडून पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे आज (दि.९) उद्घाटन करण्यात आले. दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू होती. मात्र कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता भाजपाने हा पूल नागरिकांसाठी खुला केला आहे.
महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन झाले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, नगरसेविका निर्मला कुटे, ममता गायकवाड, आरती चोंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संजय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपळे सौदागरमधील जगताप डेअरीजवळ असलेला साई चौक हा मुख्य रहदारीचा चौक आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. म्हणूनच या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल तसेच ग्रेटसेपरेटरचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले होते. मात्र नेत्यांच्या प्रतिक्षेत या पूलाचे उद्घाटन रखडले होते.
याबाबत बोलताना नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे म्हणाले की, आमच्या सततच्या पाठपुराव्याने नवनगर विकास प्राधिकरण यांच्या मार्फत साई चौक येथे उड्डाणपूल बांधण्याबाबत ठरविण्यात आले होते. साई चौक येथील उड्डाणपुलाची एक बाजू (काळेवाडी ते औंध मार्ग) चे काम पुर्ण झाले असून नागरी वाहतुकीस सज्ज आहे. तसेच उड्डाणपुलाची दुसरी बाजू (औंध ते काळेवाडी) चे काम पुर्ण झाले असुन आज वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये आयटी कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा वर्ग व रहिवास्यांना वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, काळेवाडी, रावेतमध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असुन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.






















Join Our Whatsapp Group