पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शहरातील महिलांना द्यावयाच्या प्रशिक्षणासाठी संस्था निवडीची प्रक्रिया सर्व नियम व कायदे मोडीत काढून सुरू आहे. महापालिकेच्या तिजोरीची लूट करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणे एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेला हा प्रकार तात्काळ थांबवावा. तसेच नियमांनुसार निविदा प्रक्रिया राबवून महिला प्रशिक्षणासाठी संस्थेची निवड करण्यात यावी. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे.
यासंदर्भात माजी आमदार विलास लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. हे व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडण्याची पद्धत निविदा राबवून करणे अपेक्षित असताना महिला व बालकल्याण विभागाने थेट अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड केली व तसा ठरावही केला. या ठराव चुकीचा असताना पुन्हा स्थायी समितीने यामध्ये सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अखिल भारतीयच्या ऐवजी चार्म्स या संस्थेला हे काम देण्याचा सदस्य प्रस्ताव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मूळ प्रस्तावात बदल करण्याचे अधिकार स्थायी समितीला नसताना देखील त्यात बदल करून सत्ताधार्यांच्या संबंधित संस्था घुसडण्यात आली. या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास महापालिका अधिनियमातील तरतुदींची मोडतोड होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये. तसेच २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १५ ते १८ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. नागरवस्ती विभागाकडे प्रशिक्षणासाठी ११ कोटी रुपये शिल्लक असून हा निधी लाटण्याच्या उद्देशाने चालू वर्षाचे काम देण्याचा घाट घालण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षाचे काम दिल्यास प्रशिक्षणाच्या नावाखाली वरील रक्कमेची लूट होणार आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांतच प्रशिक्षणाचे काम सुरू करावे तसेच संस्थेची निवड करताना नियमातील तरतुदीनुसार निविदा प्रक्रिया राबवूनच संस्थेची निवड करण्यात यावी. हा प्रस्ताव रद्द न करता अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही लांडे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group