पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या ७४० कोटी रुपयांच्या निविदेत तब्बल ३५० कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे. यातून कंत्राटदार मालामाल होणार असल्याचा आरोप करत निविदा रद्द करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
योगेश बाबर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची तसेच मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सात वर्षांकरिता ७४० कोटींची निविदा काढली जात आहे. त्यामध्ये यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी मशिन कंत्राटदारांनी खरेदी करायचे आहेत. यांत्रिकी पद्धतीने ८ तासांमध्ये ४० किलो मीटरचे रस्ते सफाई करणे गृहीत धरून, २००६ कि.मी.रस्त्यांसाठी यांत्रिकी पध्दतीचे ५१ मॅकेनाइज्ड स्विपर, १२ हुक लोडर्स, १४ पाण्याचे टँकर अशी संख्या तसेच रस्त्यांच्या पॅकेजप्रमाणे ड्रायवर, ऑपरेटर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या निविदेमध्ये निश्चित करण्यात आली आहे. निविदेतील या निकषांप्रमाणे, एका हेवी मॅकेनाइज्ड स्वीपरचा परिचालन खर्च (म्हणजे ड्रायवर, ऑपरेटर आणी कंत्राटी कर्मचारी पगार, इंधन खर्च, देखभाल दुरुस्ती खर्च, व्यवस्थापन आणि वरखर्च) हा ५ ते ६ लाख रुपये दर महिना येणे अपेक्षित आहे. ६ लाखांप्रमाणे, ५१ मॅकेनाइज्ड स्विपरचा परिचालन खर्च ३.०६ कोटी प्रति महिना म्हणजे प्रतिवर्ष ३६.७२ कोटी याप्रमाणे ७ वर्षांकरिता २५७.०४ कोटी रुपये खर्च येईल. (या मध्ये मध्यम व हलक्या वजनाच्या मॅकेनाइज्ड स्विपरचा प्रति महिना परिचालन ६ लाखापेक्षा कमी येईल.)
बेंगळूरू महानगरपालिकेने मॅकेनाइज्ड स्विपर स्वतः खरेदी करून ते ५ वर्षांकरिता कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिले आहेत. ७४० कोटीच्या निविदा रकमेतून २५७.०४ कोटी परिचालन खर्च वजा केल्यास, जवळपास ४८२ कोटी रुपये हे ५१ मॅकेनाइज्ड स्विपरचा, १२ हुक लोडर्स, १४ पाण्याचे टँकर खरेदी करण्याकरिता महापालिका कंत्राटदारांना मोजणार आहे का? वरील सर्व वाहनांचा एकूण खरेदी मूल्य ७० कोटी रुपये जरी धरले (बाजारमूल्य उपलब्ध आहे) तरी करदात्याचे तब्बल ३५० कोटी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घालण्याचे काम कोणाच्या दबावाखाली होत आहे? सल्लागाराला हाताशी धरून अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध करण्यामागे कोणाचे लागेबांधे आहेत? रिंग करून निविदा भरणारे कंत्राट दार कोण आहेत? आपल्या अधिपत्याखाली ३५० कोटी रुपयांची उघड लूट होत असताना आपण बघ्याची भूमिका घेणार आहात का? असा सवाल उपस्थित करत हि निविदा त्वरित रद्द करावी अशी मागणी योगेश बाबर यांनी केली आहे. तसेच शहरातील रस्ते सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्याकरिता महानगरपालिकेने स्वतः मॅकेनाइज्ड स्विपर खरेदी करावेत आणि ठेकेदाला कंत्राटी पध्दतीने चालविण्यास द्यावेत अशी मागणी बाबर यांनी केली आहे






















Join Our Whatsapp Group