पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० मध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशात २४ वा क्रमांक मिळाला आहे. तर, राज्यात पिंपरी चिंचवड शहर सातव्या क्रमांक आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात मागे जात असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची यंदाच्या वर्षी सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे.
सर्वेक्षणाचा आज (दि.२०) निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षी देशात ५२ तर राज्यात १३ वा क्रमांक आला होता.
व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले. त्याऐवजी तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्या लीगमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा सहावा तर दुस-या लीगमध्ये १४ वा क्रमांक आला होता.
आता या अभियानाचा अंतिम निकाल लागला आहे. त्यात शहराची सुधारणा झाली आहे. देशात २४ वा तर राज्यात ७ वा क्रमांक आला आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत शहराची मोठी सुधारणा झाली आहे. याबाबत बोलताना पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच ५२ वरुन शहराचा नंबर २४ वर आला आहे. तर, राज्यात ७ वा क्रमांक आला आहे. स्टार रेटिंग मिळाले नाही. त्यात ६०० गुण कमी पडले. ते मिळाले असते तर शहर १५ व्या क्रमांकावर आले असते. पुढच्यावर्षी दहाच्या आतमध्ये आणण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी चिंचवड शहर पहिल्या १० मध्ये होते. शहराचा ९ वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून पहिला नंबर आला होता. २०१७ पासून त्यात घसरण सुरु झाली होती. २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड शहर पिछाडीवर गेले. ९ व्या क्रमांकावर असलेले पिंपरी चिंचवड शहर थेट ७२ व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, २०१८ मध्ये देशात ४३ वा क्रमांक आला होता. तर, राज्यात सहावा क्रमांक होता. २०१९ मध्ये पुन्हा त्यामध्ये घसरण झाली होती. शहराचा देशात ५२ वा तर राज्यात १३ वा क्रमांक आला होता. यावेळी २०२० मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली आहे. देशात २४ वा तर राज्यात ७ वा क्रमांक आला आहे.






















Join Our Whatsapp Group