पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्याची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईची निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव महापालिका महासभेत आज गुरुवारी (दि.१८) फेटाळण्यात आला. राजकीय, ठेकेदारांच्या वादात अडकल्यामुळे मागील दोन वर्षांपासून या निविदाप्रक्रियेचा घोळ सुरू आहे. रोडस्वीपर निविदा सत्ताधारी भाजपने सफाई कामगारांसाठी फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या शहरातील रस्त्याची यांत्रिकी पद्धतीने (रोडस्वीपर मशीन) साफसफाई करण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यतेचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी होता. यामध्ये शहराचे चार भाग करून रस्ते सफाईसाठी रोडस्वीपरची ही निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे. चार पॅकेजमध्ये सात वर्षांसाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. चार पॅकजमध्ये सुमारे 928.25 किमी लांबीच्या रस्त्यांचा समावेश होता. या संपूर्ण कामावर अंदाजे 463 कोटी 94 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.
दरम्यान, शहरातील 18 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्ते साफसफाई मनुष्यबळाच्या सहाय्याने करण्याची निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती. ती निविदाच रद्द करण्यात आली. त्यानंतर रोडस्वीपरची निविदा प्रक्रिया देखील आज महासभेत फेटाळून लावण्यात आली. त्यामध्ये शहरातील सफाई कामगार बेरोजगार होऊ नयेत, यासाठी ही निविदा रद्द करावी, अशी भूमिका सत्ताधारी भाजप घेत असल्याचा खुलासा पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.






















Join Our Whatsapp Group